झी मराठीची ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात ‘झी मराठी’ वाहिनी हि अत्यंत लाडकी वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. पण गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद करण्याची वेळ वाहिनीवर आली. दर्जेदार कथानक असूनही काही मालिकांना जबरदस्ती बंद करावे लागले. यामध्ये आता लोकप्रिय ठरलेली ‘नवा गाडी नवं राज्य’ या मालिकेचा देखील समावेश झाला आहे.

गेल्या ५ महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका बंद झाल्या. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ आणि ‘३६ गुणी जोडी’नंतर ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका बंद होणार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील काही मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले होते. हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमामुळे ४ डिसेंबरपासून ‘चला हवा येऊ द्या’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ या कार्यक्रमाच्या वेळा बदलल्या गेल्या.

त्यानुसार ‘चला हवा येऊ द्या’ रात्री ८.३० वाजता, ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता आणि ‘३६ गुणी जोडी’ दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. यातील ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या प्रेक्षकांनी वेळ बदलण्यास तीव्र विरोध केल्याने हा निर्णय मागे घेतला गेला. पण ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता प्रसारित होत असल्याने मालिकेचा प्रेक्षक वर्ग तुटला. अशातच २ दिवसांपूर्वी या मालिकेचं शूटिंग संपल्याने डिसेंबर महिन्यातच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.