मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरी; 6 लाखांचे दागिने गेले चोरीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नेहाच्या वांद्रे पश्चिम येथील फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. तिच्या घरातून एकूण ६ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले असल्याचे समोर आले आहे. याबाबत नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बायस यांच्याकडे कामावर असलेल्या चालक रत्नेश झा यांनी पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३व्या मजल्यावरील बायस यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली आहे.

शार्दूल बायस यांना ४ वर्षांपूर्वी लग्नात भेट मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी हरवल्याचे तक्रारीत नमूद आहे. हे दागिने ते सहसा बाहेर जाताना घालत आणि घरी येताच मदतनीस सुमित कुमार सोलंकी यांच्याकडे सोपवत. दरम्यान हे दागिने मदतनीसाने बेडरूमच्या कपाटात ठेवल्याचे, पोलीस तक्रारीत म्हटले आहे. सुमित सोलंकीसोबत घरातील इतर मदतनीसदेखील घरातच राहतात. घटनेच्या दिवशी बायस बाहेर जाताना कपाटात दागिने शोधत होते. मात्र त्यांना दागिने सापडले नाहीत आणि त्यामुळे घरातील सर्व लोकांकडे चौकशी करण्यात आली, पण कोणालाच काही माहिती नव्हती. दागिने गहाळ झाल्याचं लक्षात आले तेव्हा मदतनीस सोलंकी घरी नव्हता. त्यामुळे बायस यांनी सोलंकीशी संपर्क साधला.

यावेळी सोलंकी तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचं त्याने सांगितलं. दागिन्यांविषयी विचारलं असता सोलंकीने हे दागिने नेहमी ठेवले जातात तिथेच ठेवल्याचं सांगितलं. मात्र, बायस यांनी शोधाशोध केली असता दागिने सापडले नाहीत. यामुळे सोलंकीविरोधात संशय वाढल्याने बायस यांनी त्याला घरी परतण्याची सूचना केली. परंतु सोलंकीने घरी येण्यास उशीर केला. परिणामी बायस यांचा ड्रायव्हर झा याने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करत सोलंकीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी कारवाई करत सोलंकीला अटक केली असून चौकशी सुरु आहे. अद्याप चोरीचे मिळालेले नाहीत.