अक्षरा- अधिपतीच्या साखरपुड्याला दामले बुवा येणार..?; कविता मेढेकर म्हणाल्या..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या मालिकेत आलेला ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलाच पत्थ्यावर पडला आहे. मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी ही मुख्य पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली आहेत. दरम्यान अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आजपासून हा विशेष सप्ताह सुरु होतोय. दरम्यान मालिकेतील भुवनेश्वरी म्हणजेच कविता मेढेकर यांचा एक प्रोमो व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये प्रशांत दामले दिसत आहेत. यामुळे आता मालिकेत प्रशांत दामले एंट्री घेणार असल्याचे बोलले जात आहे.

हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा विशेष सप्ताह रंगणार आहे. तर दुसरीकडे मालिकेत प्रशांत दामले यांची एंट्री होणार म्हणून प्रेक्षक खुश आहेत. पण केवळ प्रमोशन व्हिडीओवरून असा अंदाज लावला जात आहे. यामुळे हे खरं कि खोटं..? याबाबत स्वतः अभिनेत्री कविता मेढेकर म्हणजेच मालिकेतील अधिपतीची आई भुवनेश्वरी यांनी खुलासा केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत भुवनेश्वरी प्रशांत दामलेंना आमंत्रण देताना दिसते आहे. यामध्ये अक्षरासाठी लिहीलेलं गाणं गायला प्रशांत दामलेंनी साखरपुड्याला यायचं असं धमकीवजा आमंत्रण देताना भुवनेश्वरी दिसली होती.

या व्हिडीओमुळे प्रशांत दामले ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांना आता कविता मेढेकर यांनी एका माध्यमाशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या कि, ‘प्रशांतने तो प्रोमो ‘’झी मराठी’’साठी आणि माझ्यासाठी केला होता. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो प्रोमो केला होता. या प्रोमोनंतर प्रशांतची मालिकेत एंट्री होणार अशी चर्चा सुरू होईल, याची अजिबात अपेक्षा नव्हती. पण खरंच या मालिकेत त्याची एंट्री वगैरे काही होणार नाहीये’.