हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात वसले आहेत. कोरोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांची साथ न सोडता त्यांना खळखळून हसवलं. पण गेल्या दोन महिन्यांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार, तंत्रज्ञ मंडळी सुट्टीवर गेले होते आणि त्यामुळे शो बंद होता. पण आता विनोदवीर परतले असून नव्या जोमाने शूटिंगला सुरुवात झाली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार मंडळी सुट्टीवर गेल्यामुळे शो बंद होता. पण प्रेक्षकांच्या आठवणीत ही मंडळी कायम असायची. ज्यामुळे सोशल मीडियावर सतत प्रेक्षकांकडून हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात होती. यानंतर आता प्रेक्षकांच्या मागणीचा मान ठेवून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम येत्या काही दिवसात पुन्हा एकदा सुरु होतो आहे. महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाले असून शूटिंग सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने शेअर केला आहे. याशिवाय सोनी मराठीवर एका प्रोमोसोबत हास्यजत्रा कधी सुरु होणार हे सांगण्यात आले आहे.
प्राजक्ता माळीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सेटवरचा एक खास व्हिडीओ शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी हास्यजत्रेच्या सेटवरील आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहून प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे. प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सगळे कलाकार मजा करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘….आणि काल शूटिंगला सुरुवात झाली. प्रेक्षकांची आवडती हास्य थेरपी आता १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम १४ ऑगस्ट २०२३ पासून सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता पुन्हा एकदा सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.