महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरमध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्या मागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ऍप्रनमध्ये दिसत आहे. तर प्रथमेशजवळ पृथ्वीक प्रताप आहे. या पोस्टरमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत. त्या आठ गरोदर बायका… त्यामुळे आता हे प्रकरण नेमके काय आहे..? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर या चित्रपटाचे निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटाच्या कथानकात एक हलकी फुलकी कॉमेडी आणि सामाजिक संदेश दडलेला आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती टिझर, ट्रेलर आणि प्रदर्शनाची.