अहिल्यादेवीच्या साम्राज्यात पारुचा निभाव लागणार..? नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय मराठमोळी वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. पण गेल्या काही काळात या वाहिनीच्या अनेक मालिका कमी टीआरपीमुळे बंद केल्या गेल्या. यानंतर आता नव्या जोमात झी मराठी वाहिनी काही नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यातील ‘पारु’ या मालिकेचा नवा प्रोमो अलीकडेच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी ‘झी मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘पारु’ या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित केला गेला. या प्रोमोमध्ये निरागस पारु आणि कडक शिस्तबद्ध असलेल्या अहिल्यादेवी यांच्या दराऱ्याचं दर्शन घडत आहे. मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे हि ‘पारु’ या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे आणि मुग्धा कर्णिक यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच या मालिकेत इतर काही मालिकांच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेले अनेक कलाकार आपल्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत.

‘जीव माझा गुंतला’ फेम पूर्वा शिंदे, ‘तू चाल पुढं’ फेम परी तेलंग, ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ फेम अनुज साळुंखे, ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्राजक्ता वाडये, ‘शुभविवाह’ फेम विजय पटवर्धन हे कलाकारसुद्धा या नव्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. शिस्तीला कडक असणाऱ्या अहिल्यादेवींच्या राज्यात अल्लड, निरागस आणि हसरी पारु टिकणार का..? हे पाहण्यासाठी हि मालिका पाहणे गरजेचे आहे. सध्या तरी या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहेत.