‘या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या नव्या टीझरने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ‘श्री शिवराज अष्टक’ तयार करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार..? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शिक ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या या दुसऱ्या टिझरमध्ये शिवराय शंभूबाळाला सिंहासन म्हणजे काय आणि त्याचे नेमके महत्व काय आहे..? हे समजावून सांगत आहेत. या टिझरमध्ये छत्रपती शिवराय शंभूराजेंना ‘कसं वाटतंय सिंहासन..?’ असे विचारताना दिसतात. यावर शंभूराजे म्हणतात, ‘हे सिंहासन पाहून कुणाचीही मान अदबीने झुकेल’. यावर शिवराय शंभूबाळाला निक्षून सांगतात कि, ‘एक गोष्ट सदैव ध्यानी ठेवा!! या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार आहे. कारण हे सिंहासन म्हणजे कुणा विलासी राजाची मक्तेदारी नव्हे, तर गोरगरीबांचे आश्रयस्थान आहे’.

‘हे सिंहासन म्हणजे मौजमजेचं अनिर्बंध स्थान नव्हे, तर गांजलेल्या पिंजलेल्याना आधार देणारं शक्तीपीठ आहे. हे सिंहासन म्हणजे अनाभोवती राज्य सरकाराचं सत्ताकेंद्र नव्हे, तर अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आहे’.यानंतर पुढे शंभूराजांच्या पराक्रमाची कहाणी सुरु होते. अत्यंत सुंदर आणि प्रसंगाला धरून असणारे संवाद, उत्तम पद्धतीने दिग्दर्शन आणि इतिहासातील अंगावर काटा आणणाऱ्या घटना या चित्रपटातून पहायला मिळणार आहेत. ‘शिवरायांचा छावा’मध्ये अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर तर जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.