हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून राज्यभरातील थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’नंतर आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आपण पाहिली. हीच उत्सुकता आता थिएटरमध्ये ओसंडताना दिसत आहे. ‘झिम्मा २’ हा चित्रपट कसा आहे..? याबाबत अनेक प्रेक्षक, कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सूनेने म्हणजेच पूर्वा पंडितने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्वा पंडितने तिच्या पोस्टमध्ये निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. सोबतच लिहिलंय कि, ‘मी काल रात्री या विलक्षण स्त्रीमुळे एक उत्साहपूर्ण अनुभव घेऊ शकले. ज्या विलक्षण स्त्रीला मी अभिमानाने मम्मा म्हणते. मित्रांनो मी खरं सांगते, ”झिम्मा २” चित्रपटात माझी मम्मा पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहे. माझे हे शब्द लक्षात ठेवा. इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी ”झिम्मा २”च्या संपूर्ण टीमची अभिनेत्यांपासून ते अगदी सर्व तंत्रज्ञांचे आभार मानते. त्याबरोबरच ”कॅप्टन ऑफ द शिप” असलेल्या हेमंत ढोमेने इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी त्याची आभारी आहे’.
पुढे लिहिलंय, ‘मी चित्रपटांबद्दल सहसा बोलत नाही. पण या चित्रपटाने मला खूप भारावून टाकले आहे. मी काल रात्री हा चित्रपट पाहिल्यानंतर अजूनही त्यातून बाहेर पडू शकत नाही. मी फक्त इतकंच सांगेन की ”झिम्मा २” हा चित्रपट भारतीय सिनेमांचा स्तर उंचावेल. या चित्रपटाचा आशय, विषय हा आताच्या काळाशी संबंधित आणि प्रेमळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन ”झिम्मा २” पाहा’. पूर्वा पंडितच्या या पोस्टवर अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी कमेंट करत लिहिलंय, ‘माझं गं ते सोनू’. यासोबत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. यावर क्षिती जोगनेही हार्ट इमोजी शेअर केले आहेत.