नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन. डी. स्टुडिओत अंत्यसंस्कार होणार; निकटवर्तीयांची माहिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत एन.डी. स्टुडीमध्ये आढळून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. देसाईंनी कर्जत येथील स्वतःच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नितीन देसाईंनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय..? हे अजूनही समोर आलेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कर्जबाजारीपणा आणि स्टुडिओवर जप्तीचे संकट या अडचणींना कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

नितीन देसाईंचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. तर आलेल्या रिपोर्टनुसार, देसाईंचा मृत्यू हा गळफासाने झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. दरम्यान देसाईंच्या पार्थिवावर उद्या संस्कार केले जातील असे सांगितले जात आहे. त्यांची मुले परदेशात राहत असल्याने ती भारतात आल्यानंतरचं देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच नितीन देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीयांकडून इतर महत्वाची माहिती मिळाली आहे.

दिवंगत नितीन देसाई यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी, संध्याकाळी एन. डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नितीन देसाई यांची मुले अमेरिकेत स्थित असल्यामुळे ती मुंबईत आल्यानंतर देसाईंना अखेरचा निरोप देऊ, अशी माहिती नितीन देसाईंचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी एका नामवंत वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही याची नोंद घ्यावी.