हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. अक्षयाने या मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर आता अक्षया रंगभूमीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नाटकात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्याची पहिली झलक समोर आली आहे.
भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी रंगभूमीवर येत असलेल्या या नव्या नाटकाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या नाटकातील अक्षयाचा खास लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कानटोपी, मोठा चष्मा घातलेली एक वृद्ध स्त्री दिसतेय. हि वृद्ध स्त्री म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक आहे हे लक्षात येते. ‘ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत आणि नव्या मंचावर येणार तुम्हाला भेटायला! लवकरच’, असं लिहीत अक्षयाने नाटकाची पहिली झलक शेअर केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर लिखित हे एक जुनं नाटक आहे जे पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमी गाजवण्यास सज्ज झालं आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक साधारणतः पंचवीस वर्षे जुनं आहे. या नाटकाच्या संगीताची जबाबदारी सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी सांभाळली होती. अद्याप या नाटकाबाबतची पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र हे नाटक त्याकाळी प्रचंड गाजले होते आणि प्रेक्षकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमकं हे नाटक कोणतं..? याबाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.