मार्च महिन्यात होणार कल्लोळ.. नव्हे ‘लग्न कल्लोळ’; सिद्धूच्या नव्या सिनेमाचं पोस्टर आऊट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक आगळा वेगळा प्रयोग आणि भन्नाट कथानक असलेला नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लग्न कल्लोळ’ असे आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले असून या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. जे सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘लग्न कल्लोळ’ या सिनेमाच्या जबरदस्त मोशन पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव हि कलाकार मंडळी चक्क लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार..? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट येत्या १ मार्च २०२४ रोजी राज्यभरातील सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट ‘लग्न’ या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात ‘कल्लोळ’ काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.