ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिनी ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी इतिहासाची विविध पाने रुपेरी पडद्यावर उलघडली आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे हे ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले. विविध ऐतिहासिक चित्रपटांच्या रिलीजदरम्यान गतवर्षी ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आता चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

पावनखिंड रणसंग्राम दिनाचे औचित्य साधून ‘वीर मुरारबाजी’ या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले अत्यंत लक्षवेधी असे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची गतवर्षी घोषणा केल्यापासूनच शिवप्रेमींमध्ये चित्रपटाबाबत मोठी चर्चा होती. यानंतर आता पहिले पोस्टर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीच बळावली आहे. हे पोस्टर ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या टीमने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिन असल्याने आम्ही शूरवीर बाजीप्रभू देशपांडे तसेच बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रम आणि बलिदानाला वंदन करुन ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे नवे पोस्टर सादर करत आहोत. लवकरच ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येईल’.

माहितीनुसार, ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटात अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर हरीश दुधाडे, तनिषा मुखर्जी, सौरभराज जैन, संतोष जुवेकर, प्राजक्ता गायकवाड या कलाकारांच्या देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. ‘वीर मुरारबाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० मावळ्यांसह पुरंदर किल्ला कसा लढवला त्याची भव्य गाथा पहायला मिळणार आहे. मुरारबाजींनी औरंगजेबाच्या पाठवलेल्या दिलेरखानाच्या सैन्यासोबत १६६५ मध्ये युद्ध केले होते आणि या लढाईत त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. नंतर मिर्झा राजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ‘पुरंदरचा तह’ केल्याचा इतिहास आहे.