‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरींच्या आयुष्यावर चित्रपट येणार; पोस्टर झाले प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी आहे. देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचे आयुष्य आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/CyC7Z0cCm39/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

‘गडकरी’ या आगामी चित्रपटामध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल..? या प्रमुख भूमिकेत कोणता कलाकार पहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे. येत्या २७ ॲाक्टोबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते अनुराग भुसारी आणि मिहिर फाटे हे आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी अनुराग भुसारी यांच्या खांद्यावर आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणाले की, ‘नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे’.