भारतमातेचा अग्निवीर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बटालियन 60’ नव्या सिनेमाची घोषणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाच्या मातीत अनेक शूरवीर होऊन गेले. ज्यांनी बॉर्डरवर भारत मातेची आन, बान अन शान कायम राखली. नेहमीच एक भव्य इतिहास रचला. ते आजही प्रत्येकाच्या समरणात राहिले. या प्रत्येक वीर पुत्राने आपल्या यशोगाथेने इतिहासाला खरा न्याय मिळवून दिला आहे. याबाबत आपण अनेक धडे, कविता, पोवाडे, सिनेमातून वारंवार जाणून घेत असतो. पण हे इतिहास घडवणारे वीर महाराष्ट्राच्या मातीत कसे घडतात..? त्यांचा जीवनप्रवास नक्की काय आणि कसा असतो..? हे सांगणारा एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊ घातला आहे. लवकरच रुपेरी पडद्यावर एक अनोखी गाथा घेऊन ‘बटालियन ६०’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘किंग प्रोडक्शन’ आणि आणि तुषार कापरे पाटील प्रस्तुत ‘बटालियन ६०’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील करणार आहेत. या चित्रपटातून मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर नायकाची कथा रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. हे शूर वीर कसे घडतात..? याची झलक आणि याचे वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे. नुकतच या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये एक पाठमोरा वीर पहायला मिळतो आहे. याशिवाय बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सीमेवर लढणारे सैनिकदेखील दिसत आहेत.

एकंदरच या चित्रपटाच्या पोस्टवरून याचे कथानक एका शूर सैनिकाची गाथा सांगणारे आहे, हे समजते. या पोस्टमध्ये दिसणारा तो पाठमोरा शूर वीर म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून ‘बलोच’ फेम अभिनेता गणेश शिंदे आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे हे एकच पोस्टर समोर आल्यामुळे केवळ गणेश शिंदे या चित्रपटाचा भाग असल्याचे समजत आहे. अद्याप चित्रपटातील इतर कलाकार कोण आहेत..? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल अशी अशा आहे. ‘बटालियन ६०’ हा चित्रपट एका शूर सैनिकाची जीवनगाथा घेऊन देशप्रेमींचा उर अभिमानाने भरून टाकणार आहे.