‘.. जो चुकला त्याला ठोकला’; महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम 376’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सचिन धोत्रे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. नुकतेच रिलीज झालेले या चित्रपटाचे पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे.

या पोस्टमध्ये फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांचे विविध प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्ड हिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे ‘कलम ३७६’ हा चित्रपट त्याचे कथानक कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले, ‘गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. २ वर्षांच्या मुली ते वृद्ध महिला बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवीन सबबी शोधत असतात. वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार, विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवतात. पण ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची कुठेही चर्चा होत नाही. आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट, अपमानास्पद नजरेने पाहतात. समाज वा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे’.