‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच..’; ‘खुर्ची’ चित्रपटाचा रक्तरंजित टिझर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातून राजकारणातील अनेक रंग दाखवण्यात येणार आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडलेला बाजार, मारामाऱ्या, खून असं एकंदर कथानक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी’ असा दमदार संवादाने या टीझरची सुरुवात आहे.

येत्या १२ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर आणि श्रेया पासलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये अभिनेता राकेश बापट, अक्षय वाघमारे आणि बालकलाकार आर्यन हगवणे या कलाकारांच्या फर्स्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचं टिझर इतका प्रभावी आहे तर चित्रपट कसा असेल याबाबत आता चर्चा सुरु आहे.

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची सूत्र संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये राजकारणाचे विविध रंग एकाच पट्टीत पद्धतशीर रेखाटण्यात आले आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांनी लिहिले आहेत. तर दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.