‘लंडन मिसळ’ घेऊन येतोय फॅमिली एंटरटेनमेंटची झणझणीत मेजवानी; देणार 440 व्होल्टचा झटका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आजतागायत अनेक कलाकृती आल्या. काही गाजल्या काही कमी पडल्या. पण मनोरंजन काही थांबलं नाही. तर असाच मनोरंजनाचा झणझणीत कट घेऊन आता ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. हा मराठमोळा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये भरत जाधव, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, गौरव मोरे. निखिल चव्हाण, माधुरी पवार अशी दमदार स्टारकास्ट पहायला मिळाली आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच या चित्रपटाचं कथानक दोन बहिणींवर आधारलेलं आहे हे समजतंय. ज्या वडिलांच्या स्वप्नासाठी धडपडत आहेत. चित्रपटात या दोन्ही बहिणी लंडनमध्ये ‘माऊली मिसळ’ हे हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे त्यांना हे हॉटेल लंडनमध्ये सुरु करायचं आहे कारण तसच त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. या दोन बहिणी म्हणजे ऋतुजा बागवे आणि रितिका श्रोत्री आपल्या भेटीस येत आहेत. दोघीनींही आपला एक वेगळा आणि हटके अंदाज यातून दाखवला आहे.

माहितीनुसार, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटासाठी पहिल्यांदाच भरत जाधव यांनी रॅप सॉंग गायले आहे. तसेच ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची जबरदस्त कथा जालिंदर कुंभार यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट यांनी केली असून वैशाली पाटील या चित्रपटाच्या सहयोगी निर्मात्या आहेत. टीझरनंतर आता प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची प्रतीक्षा आहे.