‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘शिवरायांचा छावा’ हा आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट चर्चेत आहे. श्री शिवराज अष्टकसोबतच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट कधी रिलीज होतोय याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळाली. अखेर या चित्रपटाचा टिझर समोर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार..? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिजर रिलीज झाला असून या टिजरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याची झलक पहायला मिळाली आहे. टीझरमध्ये एका भव्य घनदाट जंगलात हिंस्त्र वाघाचा सामना करताना शिवरायांचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत. इथे त्यांच्या अंगावर झालेल्या जखमा त्यांच्या शौर्याची वाच्यता करत आहेत. इथे संभाजी महाराज वाघाचा सामना करत त्याच्या शेपटीला धरुन त्याला ओढत आणताना दिसतात. असा हा अंगावर काटा आणणारा टिझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या टिजरमध्ये अभिनेता भूषण पाटील हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा टिझर शेअर करताना दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं आहे कि, ‘कोण शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा “शिवरायांचा छावा”.. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील. प्रथम दर्शन शिवरायांचा छावा’. हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे.