भरत जाधव देणार मनोरंजनाचा झणझणीत झटका; तर्रीदार ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट चर्चेत आहे. एक अनोखं नाव आणि एक भन्नाट गोष्ट घेऊन चटपटीत मनोरंजन करायला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता भरत जाधव, ऋतुजा बागवे, गौरव मोरे, माधुरी पवार अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग काहीसे भारतात तर काही लंडनमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव एका वेगळ्या आणि अत्यंत हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मुख्य म्हणजे यावेळी भारत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप सॉंग गायलं आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित असलेला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट एक मस्त हलकी फुलकी भन्नाट कॉमेडी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल होत आहे. ‘लंडन मिसळ’ चित्रपटातले चटपटीत सीन्स, परदेशाचे सौंदर्य आणि कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुरेसे आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर कलाकारांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. यावेळी भरत जाधव, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार उपस्थित होते.