प्राजक्ता गायकवाड शिंदे गटात सामील होणार..?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताने साकारलेल्या महाराणी येसूबाई या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आणि याच भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. सध्या ती अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. दरम्यान प्राजक्ता या कारणांमुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

एकीकडे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात सामील होणाऱ्या कलाकार मंडळींची संख्या हि दिवसागणिक वाढतच चालली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या भरतीमागचे नेमके कारण काय..? यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता गाईकवाडने हा फोटो शेअर करताना सोबत एक हटके कॅप्शनही दिले आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर ग्रेट भेट’. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतीच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याला भेट दिली आणि यावेळी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिले. प्राजक्ता आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ही अभिनेत्रीसुद्धा शिंदे गटात सामील होणार.. अशी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी तिला ‘भावी आमदार’ म्हटले आहे. तर काहींनी प्राजक्ताला ‘ताई राजकारणात जावू नका’, असा सल्ला दिला आहे.