प्रदीप वेलणकरांची पंच्याहत्तरी!! अशोक मामांसह मराठी कलाकारांनी लावली हजेरी; फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत मनोरंजन सृष्टीला आयुष्य वाहिलेले अभिनेते प्रदीप वेलणकर यांची अलीकडेच पंच्याहत्तरी पूर्ण झाली. वयाच्या या टप्प्यावर येऊनही प्रदीप वेलणकर मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. गेल्या ४८ वर्षांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशा सर्वांच्या लाडक्या प्रदीप वेलणकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र जमले होते. सर्वांनी मिळून त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

प्रदीप वेलणकर यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन एका खास सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रजनी वेलणकर, मुली मीरा आणि मधुरा वेलणकर, तसेच जावई अभिजित साटम आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. इतकेच नव्हे तर या वाढदिवसाच्या सोहळ्यात प्रदीप वेलणकर यांचे घनिष्ट मित्रदेखील सहभागी झाले होते. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अशोक सराफ, अभिनेत्री वंदना गुप्ते, ईला भाटे, चिन्मयी सुमित आणि अनेक कलाकार मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होती.

सध्या सोशल मीडियावर प्रदीप वेलणकर यांच्या पंच्याहत्तरीचे हे खास क्षण व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवार दिसत आहे. या सोहळ्यात प्रदीप वेलणकर यांचे औक्षण करण्यात आले. उदंड आयुष्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आणि आनंदात जंगी पार्टी करण्यात आली. अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कारकीर्द फार मोठी आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असंभव’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘जिवाची होतिया काहिली’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. तर ‘चकवा’, ‘रॉकी’, ‘बकेट लिस्ट’, ‘बटरफ्लाय’ या मराठी चित्रपटांसह ‘सिंघम’, ‘पेज थ्री’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी कमालीच्या भूमिका साकारल्या आहेत.