हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असणाऱ्या म्हणजेच प्लॅनेट मराठीला नुकतीच दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षांपासून प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांचे दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट असा आशय देऊन निखळ मनोरंजन केले. त्यांनी आपले वेगळेपण कायमच जपून ठेवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच त्यांनी सर्वोत्तम कॅान्टेंट आणला. मागील वर्षी प्लॅनेट मराठीने वर्षपूर्तीनिमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्याकरता दर्जेदार आशयाच्या वेबसीरिज, वेबफिल्म्स, शॉर्टफिल्म्स, टॅाक शो, ट्रॅव्हल शो आणले.
यावर्षीही प्लॅनेट मराठी असाच नावीन्यपूर्ण कॅान्टेन्ट आपल्या जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. त्याच जोडीने यंदाचे सेलिब्रेशन प्लॅनेट मराठीने जरा हटके पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. या वेळी प्लॅनेट मराठी आपल्या सबस्क्रिप्शनचे आलेले पैसे श्रवण टिफिन सेवा या सेवाभावी संस्थेला देणार आहेत. श्रवण टिफिन सेवा ही संस्था निराधार आजी आजोबांना दोन वेळेचं जेवण देतात. त्यांना हातभार म्हणून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये जेवढे सबस्क्रिप्शनचे पैसे येतील, ते या संस्थेला देणार आहेत. ही आगळ्यावेगळ्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करणे, निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे.
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या वर्षपूर्ती निमित्त प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘प्लॅनेट मराठी यंदा ही वर्षपूर्ती सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत साजरी करणार आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन तर आम्ही कायमच करणार आहोत. त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण विषयाचे आशय घेऊन येण्यासाठी आम्ही कायमच वचनबध्द आहोत. आत्तापर्यंत जसे प्रेम दिले, तसेच प्रेम यापुढेही प्रेक्षक देतील, अशी मला खात्री आहे’.