‘कवितेतून प्रेम व्यक्त करणं कमीपणाचं…’; रोमँटिक कवितांवरून हिणवणाऱ्यांना सौमित्र यांचं प्रत्युत्तर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम हि अशी भावना आहे जिला व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज लागते. हे शब्द एकमेकांमध्ये अलगद गुंफले कि मग तयार होणारी कविता प्रेमवीरांच्या मनातील भावना व्यक्त करते. सौमित्र म्हणजेच किशोर कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि कवी म्हणून ओळखले जातात. ते कायम आपल्या कवितांच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. त्यांच्या प्रेमकविता तर युगलांमध्ये कायम गाजतात. दरम्यान एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कवितेचं बदलंत स्वरूप, गाणं आणि फरक यावर आपले मत मांडले आहे.

किशोर कदम यांना विचारण्यात आले कि, ‘गाणं हे कवितांपेक्षा कमी असतं का..?’ या प्रश्नावर उत्तर देताना किशोर कदम म्हणाले कि, ‘अजिबातच नाही… ज्या माणसाला चांगलं गाणं लिहिता येत नाही, तो चांगली कविता लिहू शकत नाही. मुक्त छंदातील कवितेत सुद्धा सुप्त गाणं असतं. माझे अनेक मित्र मला तुम्ही रोमॅंटिक कवी आहात असं म्हणतात. पण, कवितेतून प्रेम व्यक्त करणं कमीपणाचं नसतं. माझं मत विचाराल तर जो माणूस कविता लिहितो, तो प्रत्येक माणूस रोमॅंटिक असतो.

‘रोमॅंटिक असल्याशिवाय तुम्हाला कविता लिहिताच येऊ शकत नाही. त्यामुळे रोमॅंटिक कवितांवरुन जे लोक हिणवतात त्यांना कविता कळत नाही असं मला वाटतं. कवितेत किंचित नाट्य हवं, किंचित वेडेपणा पाहिजे, दोन घोट दारू, थोडासा ओलावा, तर थोडंसं राजकारण आणि प्रेमही पाहिजे. एका कवितेत या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्यात येतात ती कविताचं उत्तम असते’. सौमित्र अर्थात किशोर कदम यांचे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.