‘मराठी कलासृष्टीची मोठी हानी झाली..’; रवींद्र महाजनींना राजकीय नेतेमंडळींनी वाहिली श्रद्धांजली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मराठी सिनेविश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या निधन वार्तेने सिनेसृष्टीला हादरा दिला. ‘देवता’, ‘झुंज’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा सुपरहिट चित्रपटांमधून मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य करत आलेल्या रविंद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडेमधील आंबी येथे राहत्या फ्लॅटमध्ये आढळला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू नक्की केव्हा झाला हे अजूनही ठामपणे सांगता येणार नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू ३ दिवसांपूर्वी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वचं नव्हे तर राजकीय विश्वातही शोकाकुल वातावरण आहे.

अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनावर अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. सोबतच अनेक राजकिय मंडळींनी देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार अशा राजकीय मंडळींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले कि, ‘आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.’

तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील ट्विट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिलयं की, ‘मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानं दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे.’

याशिवाय भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘मराठी चित्रपटसृष्टीत चतुरस्त्र अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अत्यंत दुःखी झालोय. उत्तुंग अभिनयासह विविध भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!’