‘शेणानं घर सारवणारी.. हसतमुखानं राबणारी माझी आजी..’; मराठी अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिकेतून प्रकाशझोतात आलेले आणि त्यानंतर बिग बॉससारख्या रिऍलिटी शोमधून खणखणीत नाण्यासारखे वाजलेले अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आजही ते व्यक्त झाले आहेत. पण यावेळी त्यांनी जावेद अख्तर लिखित काही ओळींचा आपल्या पोस्टमध्ये सारांश मांडला आहे. त्यांनी लिहिलंय, ‘एक ये घर, जिस घरमें मेरा ‘साज़-ओ-सामाँ’ रहता है… एक वो घर, जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थीं! …जावेद अख़्तरनं लिहीलेल्या ओळी हल्ली मी सतत स्वत:शी पुटपुटत असतो. आजकाल शुटिंगनिमित्तानं खूप जुना काळ जगतोय. तीन- चार पिढ्या आधीचा एक कष्टकरी माणूस साकारतोय. त्या काळातल्या घरात शेणानं सारवलेल्या जमिनीवर झोपतोय. मातीच्या भिंतींना टेकून बसतोय. प्रत्येक सिन करताना तिथला तो शेणामातीचा गंध मला सतत माझ्या आजोळच्या जुन्या घरी घेऊन जातोय. त्या घरात हसतमुखानं राबणारी माझी आजी डोळ्यांपुढे येते’.

‘दर आठपंधरा दिवसांनी घर शेणानं सारवणारी, मातीच्या चुलीला पोत्यारा देणारी, पहाटे पहाटे बंब पेटवून घंगाळ्यात गरम पाणी ओतून आम्हाला अंघोळी घालणारी, सरपणातली लाकडं चूलीत सारत, फुंकणीने फुंकर मारत भाकर्‍या थापणारी… आज माझ्या आजोळी शेतात आलिशान महालासारखं घर उभं आहे. सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या आहेत. पण ते जुनं घर आठवलं की जावेद अख़्तरच्या ग़ज़लेतली ‘बुढी नानी’ मला अस्वस्थ करते.. काळजात कालवाकालव होते… काहीजण म्हणतील, बदल होणारच हो. आपण अजून तसंच चुली फुंकत जगायचं की काय?… नाही हो ! जावेद अख़्तरसारखा शायर इतकं सोपं-वरवरचं थोडीच लिहील? यातली ”बूढ़ी नानी” हे एक रूपक आहे. त्या काळातल्या भोळ्याभाबड्या, साध्यासरळ, नि:स्वार्थी जगण्याचं प्रतिक! ते नितळ जगणं आज आपण हरवलंय. जगण्यासाठीच्या गरजा मर्यादित असलेला काळ… अन्न- वस्त्र- निवार्‍यापलीकडच्या चैनीच्या वस्तूंनी, ”साज़-ओ-सामाँ’;नी घरात शिरकाव केला नव्हता, तो काळ… जास्तीच्या वस्तूंची ‘हाव’ नव्हती’.

‘एकमेकांमधल्या प्रेमावर, स्नेहावरच सगळा भरोसा होता. दुपारी शेतात झाडाखाली, तर संध्याकाळी पारावर एकत्र जमून एकमेकांची सुखदु:खं जाणून घ्यायची. आपल्या शेतातल्या भाजीपाल्याच्या एकदोन मुठी शेजार्‍याच्या घरात देऊन मगच सैपाकाची तयारी करायची. रात्री जेवणानंतर अंगणात चांदण्या मोजत, गप्पा मारत अलगद, हळूवार झोप लागायची… तो काळ!’ खरंच… एक ये दिन, जब अपनों ने भी हम से नाता तोड़ लिया, एक वो दिन, जब पेड़ की शाख़ें बोझ हमारा सहती थीं… एक ये दिन, जब सारी सड़कें रूठी रूठी लगती हैं… एक वो दिन, जब ‘आओ खेलें’ सारी गलियाँ कहती थीं!’ किरण माने यांची हि पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलंय, ‘कमाल लिहीलयं सर…’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘इतकं सुंदर लिहिता तुम्ही खरंच.. इतका चॅन कि सगळं चित्र असं समोर इमॅजिन होतं. मी तुमची प्रत्येक पोस्ट आवर्जून वाचते’.