ती येतेय..!! ‘निळावंती’चे गूढ रहस्य उलगडणार..? पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध कथानकाच्या वेगवेगळ्या कलाकृती कायम प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. यामध्ये कॉमेडी, ऍक्शन, फॅमिली ड्रामा, हॉरर या जॉनरच्या चित्रपटांचा विशेष चाहता वर्ग आहे. याशिवाय रहस्यमय अर्थात सिक्रेट कथानकांचा देखील फार मोठा चाहता वर्ग आहे. अशा प्रेक्षकांसाठी लवकरच एक आगळी वेगळी रहस्यमय कथा घेऊन ‘निळावंती’ येतेय. एका गूढ कथेवर आधारित ‘निळावंती’ या चित्रपटाची अलीकडेच घोषणा करण्यात आली असून याचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘निळावंती’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये एक स्त्री तिच्या हातात कंदील घेऊन जंगलात चालत जाताना दिसत आहे. ‘निळावंती’ या शीर्षकासोबत ती येतिय… अशी अत्यंत लक्षवेधक टॅगलाईन दिसते आहे. टॅगलाईमूळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढू लागली आहे. या पोस्टरमध्ये दिसणार ‘ती’ अभिनेत्री कोण आहे..? या चित्रपटात कोणकोणते कलाकार पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

हा चित्रपट ‘निळावंती’ या गूढ ग्रंथावर आधारलेला आहे अशी माहिती लेखक आणि दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी दिली आहे. या ग्रंथाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. सहसा हा ग्रंथ कोणी वाचत नाही आणि याच कारण आहे अफवा. खूप वर्षांपासून या ग्रंथाबाबत काही अफवा पसरलेल्या आहेत. हा ग्रंथ वाचल्याने माणसाची मती गुंग होते, बुद्धी फिरते किंवा मृत्यू होतो अशा प्रकारच्या अफवांनी जोर धरल्यामुळे अनेकांनी हा ग्रंथ वाचलेला नाही. तर याच ग्रंथावर आधारलेला हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून ‘निळावंती’ ही राक्षसी की दैवी…? याबाबत असणाऱ्या अफवा सत्य की असत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.