संकल्प!! प्राजक्ता माळी करणार ’12 ज्योतिर्लिंग यात्रा’; परळी वैजनाथाच्या दर्शनाने केला प्रारंभ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात प्राजक्ता माळी हि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे सोशल मीडियावरदेखील तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकतीच प्राजक्ताने सोमवारी एक खास पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने परळी वैजनाथाचे दर्शन घेतल्याचे दिसत आहे. सोबतच प्राजक्ताने केलेल्या संकल्पाविषयी तिने स्वतःच माहिती दिली आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती भगवान महादेवाच्या भक्तीत लीन झाल्याचे दिसत आहे. यावेळी ती महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना आणि मनोभाव आरती करताना दिसत आहे. या फोटोंसोबत प्राजक्ताने कॅप्शन लिहिलं आहे कि, ‘चिदानंद रूपा “शिवोऽहम् शिवोऽहम्”…. आजच्या सोमवारी संकल्प सोडला.. येत्या वर्षात “१२ ज्योतिर्लिंग यात्रा” करणार. आज सुरूवात झाली – “महाराष्ट्रातल्या – परळी वैजनाथ” पासून. (ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता, पण कामाच्या commitments मध्ये ते शक्य नाही. आपणांस तसे जमत असेल तर जरूर करावे. एकसंधपणे यात्रा करणे इष्ट.)’ या पोस्टसोबत प्राजक्ताने #महादेव #साधक #शिवभक्त असे हॅशटॅग वापरले आहे.

प्राजक्ता माळीने हि पोस्ट शेअर करताना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री येत्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये ‘१२ ज्योतिर्लिंग यात्रा’ करणार आहे. ज्याची सुरुवात तिने कालच्या सोमवारपासून केली आहे. या यात्रेची सुरुवात करताना तिने महाराष्ट्रातील परळी वैजनाथ मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले आहे. प्राजक्ताच्या यात्रा प्रारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी आणि चाहते प्राजक्ताला तिच्या संकल्पसाठी बळ आणि शुभेच्छा देत आहेत. एकीकडे अन्य सेलिब्रिटी कामातून वेळ काढून फिरायला जात असताना प्राजक्ताने अध्यात्माचा मार्ग निवडल्याचे कौतुक केले जात आहे.