मालिकेच्या सेटवर जमली प्रार्थना- संकर्षणची गट्टी; जाणून घेऊया कशी आहे यांची दोस्ती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज फ्रेंडशिप डे असल्यामूळे सोशल मीडियावर सगळेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे विविध फोटो, व्हिडीओ, आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं अस्तित्व फार महत्वाचं असतं. शाळा, कॉलेज, क्लास, गल्ली अशी कुठेही आणि कशीही मैत्री होऊ शकते. अशाच एका मैत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिके दरम्यान प्रार्थना बेहरे आणि संकर्षण कऱ्हाडे यांची सेटवर चांगली मैत्री झाली. या मैत्रीविषयी बोलताना दोघांनीही एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली होती. चला तर जाणून घेऊया कसे आहेत प्रार्थना- संकर्षणचे मैत्रीचे नाते.

संकर्षणसोबतच्या मैत्रीविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली कि, ‘संकर्षण आणि मी खूप कमी दिवसात एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण झालो. आम्हा दोघांचं खूप चांगलं जुळतं आणि मला त्याचं म्हणणं नेहमी पटतं. त्याचं वागणं- बोलणं, त्याचे संस्कार, त्याचे विचार फार प्रभावी आहेत. रोज जेव्हा आम्ही गप्पा तेव्हा मला नवीन काहीतरी त्याच्याकडून शिकायला, जाणून घ्यायला मिळतं. तो खरोखर एक गुणी मुलगा आहे. जितका तो गुणी आहे तितकाच तो खोडकरही आहे. सेटवर खूप मस्ती करणारा, कोणाची टिंगल करणारा, मिमिक्री करणारा जर कोणी असेल तर तो संकर्षण आहे. त्यामुळे तो मला सेटवर कायम हसवत असतो. तो जितका खोडकर आहे तितकाच तो संस्कारीही आहे. त्याला आता दोन मुलं आहेत आणि त्यांनाही संकर्षण उत्तम संस्कार देतोय हे बघून मला खूप छान वाटतं’.

‘तो एक हरहुन्नरी कलाकार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सूत्रसंचालक अशा अनेक भूमिका तो समर्थपणे साकारतोय. ज्याप्रकारे तो स्वतःचं स्वतः अभ्यास करून अभिनय करतो हे मी रोज बघते. तो अत्यंत हुशार आहे, पण त्याला अजिबात त्याचा गर्व नाही. याउलट तो सतत नवं काय करता येईल, नवं काय शिकता येईल याच्या मागे असतो. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचंय, मोठं व्हायचंय आणि त्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. एखादी नवीन कविता केली की तो मला आवर्जून ऐकवतो. कोणतीही व्यक्ती जर आधी चांगली माणूस असेल तर तिच्या कामातही ते दिसून येतं आणि तसंच संकर्षणच्या बाबतीतही होतं. त्याचा स्वभाव हा अत्यंत प्रामाणिक, निर्मळ असल्याने त्याने लेखन केलं, अभिनय केला किंवा दिग्दर्शन केलं. त्याचं काम हे उत्तमच होतं’.

तसेच संकर्षण म्हणाला, ‘प्रार्थना खूप खरी आहे आणि ती सगळ्यांबरोबर सारखी आहे. तिच्यात भेदभाव ही भावनाच नाही. तिची पार्श्वभूमी व आताची तिची प्रसिद्धी यांचा विचार करताना हा थोडा जवळचा, हा थोडा लांबचा, या लोकांबरोबरच रहायचं, त्या लोकांशी बोलायचंच नाही असे ती कप्पे कधीच करत नाही. तिचा स्वभाव हा सगळ्यांसाठी सारखा आहे. ती सर्वांना सामावून घेते; हा तिच्यातला खूप चांगला गुण आहे आणि तो मला आत्मसात करायला खरोखर आवडेल. कारण एखादी व्यक्ती माझ्या जवळची झाली तर ती खूप जवळची होते नाहीतर अजिबात होत नाही.. पण प्रार्थनाचं तसं नाही. तसंच तिच्यात एखादी गोष्ट स्वीकारण्याची ताकद आहे. जर तिला काहीतरी येत नसेल तर प्रामाणिकपणे ती ते मान्य करते व येत नसलेली ती गोष्ट शिकण्यासाठी ती प्रयत्न करते’.

‘मला वाटतं कोणत्याही कलाकारात ही स्वीकारण्याची ताकद असणं खूप महत्वाचं असतं जी प्रार्थनामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. अभिनेत्री म्हणून ती खूप मेहनती आहे. मला तिचं मितवा चित्रपटातलं काम खूप आवडलं. त्यासोबतच ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहा कामत ही भूमिका ती ज्याप्रकारे साकारत आहे त्यासाठी तिचं खूप कौतुक वाटतं. कारण ही भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक होती. सेटवरती आमची मजा मस्ती सुरूच असते. मालिकेत आमच्यात जसं बॉण्डिंग दिसतं तशीच छान मैत्री आमची ऑफक्रीनही आहे’.