हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे उद्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत होते. आता या जोडप्याच्या ग्रहमख आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. हि जोडी त्यांचं लग्न ठरल्यापासून प्रचंड चर्चेत आहेत. आता काहीच तासांमध्ये अमृता आणि प्रसाद एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाआधीचे विधी कार्यक्रम सुरु झाले आहेत. बुधवारी ग्रहमख आणि गुरुवारी मेहंदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आज शुक्रवारी त्यांच्या हळदीचा विधी पार पडणार आहे. दरम्यान ग्रहमख आणि मेहंदीचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
अमृता आणि प्रसादने त्यांच्या ग्रहमख विधीसाठी अस्सल पारंपरिक पोशाख केला होता. अमृताने हिरव्या रंगाची नऊवारी आणि सोबत पारंपरिक दागिने परिधान केले होते. तर प्रसादने फ्लोरल डिझाईन असलेला कुर्ता आणि क्रीम कलरचा पायजमा परिधान केला होता. दोघेही एकत्र फारच सुंदर दिसत होते. तर मेहंदी सेरेमनीसाठी अमृताने पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि सोबत फुलांचे दागिने परिधान केले होते. प्रसादने मेहंदी सोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि त्यावर हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होत. सध्या त्यांच्या या दोन्ही कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत.