नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यातील ‘पारु’चा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून चांगलाच व्हायरल होतोय.

गेल्यावर्षी १६ डिसेंबरला ‘पारु’ मालिकेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. शिवाय मालिकेची पार्श्वभूमी सांगण्यात आली आहे. यामध्ये, अहिल्यादेवी किर्लोस्कर नावाच्या व्यक्तीचं राज्य पाहायला मिळत आहे आणि तिला दोन मुलं आहेत. यातील एक मुलगा कामात दंग, तर दुसऱ्याला ऐयाशीचा संग. शिस्तबद्ध आणि वचनाची पक्की असणाऱ्या अहिल्यादेवीच्या जगात जेव्हा पारु येणार तेव्हा काय होणार..? ते पाहण्यासाठी ही मालिका जरूर पहा. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद जवादे मुख्य आणि महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

तर, मालिकेच्या मध्यवर्ती भूमिकेत म्हणजेच पारूच्या भूमिकेतून अभिनेत्री शरयू सोनावणे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. शरयू सोनावणे, प्रसाद जवादे यांच्यासह अभिनेत्री मुग्धा कर्णिक देखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मुग्धा कर्णिक अहिल्यादेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून प्रसाद अहिल्यादेवीच्या मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ ही आज १३ जानेवारी २०२४ रोजी ऑफ एअर होणार आहे. यानंतर लवकरच पारू ही मालिका सुरू होणार आहे.