‘एकदा येऊन तर बघा’नंतर प्रसाद खांडेकरकडून नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार कलाकार एकत्र दिसणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर फार लोकप्रिय आहे. अलीकडेच त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांनतर आता प्रसाद खांडेकरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हि घोषणा केली आहे.

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असता प्रसादला प्रचंड प्रेम मिळाले. लोकांनी एक अभिनेता आणि त्यानंतर एक दिग्दर्शक म्हणून प्रसादला मान्य केले. यानंतर आता प्रसादच्या आगामी प्रोजेक्टबाबत आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच प्रसाद खांडेकरने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मुख्य म्हणजे प्रसादच्या या आगामी चित्रपटात मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे अशी कलाकारांची मांदियाळी असणार आहे.