हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नाव ‘एकदा येऊन तर बघा’ असे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसादने काल त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि यानिमित्त त्याने बायकोला खास सरप्राइज दिलं आहे.
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने बायकोचे डोळे झाकून तिला सरप्राइज दिल्याचे पहायला मिळत आहे. तर प्रसादने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोला स्कूटी गिफ्ट केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलंय, ‘अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट या संपूर्ण प्रवासात तुझी साथ आहे… तुझ्या संगतीशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं आणि शक्य होणार ही नाही… आज लग्नाचा दहावा वाढदिवस अजून खूप दशक पार करायची आहेत… बाकी माझी तब्येत, माझं शेड्यूल या बाबतीतल्या तुझ्या तक्रारी लवकरच सोडवेन’.
पुढे लिहिलंय, ‘तुला नेहमी मी सरप्राइज द्यावं असं वाटतं, पण मला एवढं कोळून प्यायली आहेस की मी काय सरप्राइज देणार आहे हे तू आधीच ओळखतेस. त्यामुळे ते सरप्राइज राहतच नाही… पण मला खात्री आहे आजच हे स्पेशल सरप्राइज तू नक्कीच गेस (Guess) केलं नसशील… हा आनंद आणि हे प्रेम असंच वाढत राहू दे… अप्पू… शेवटी माझं आवडत गाणं तुझ्यासाठी… आपकी मंज़िल हूँ मैं… मेरी मंज़िल आप हैं…क्यों मैं तूफाँ से डरूँ…मेरा साहिल आप हैं…कोई तूफानों से कह दे…मिल गया साहिल मुझे…आय लव्ह यू अल्पा आणि लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!’