‘दोन- तीन महिन्यांपूर्वी..’; प्रसाद खांडेकरने सांगितलं ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून एक्झिट घेण्याचं कारण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवरील ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदारने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत नाटकाबाबत एक मोठी अपडेट दिली. यामध्ये तिने ‘कुर्रर्रर्र’मधून प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव एक्झिट घेत असल्याचे सांगितले. सध्या या दोघांची जागा प्रियदर्शन जाधव आणि मयुरा पालांडे यांनी घेतली असून नाटकाचे प्रयोग सुरु राहणार आहेत. मात्र त्यांनी हे नाटक का सोडलं..? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चांना पूर्णविराम लावताना प्रसाद खांडेकरने नाटक सोडण्याचे कारण सांगितले आहे.

२ वर्षांपूर्वी हे धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर आलं. प्रसाद खांडेकर लिखित- दिग्दर्शत या नाटकात तो स्वत: आणि त्याच्यासोबत नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत होते. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याने बुकिंगदेखील चांगलं मिळत होतं. असं असूनही ‘कुर्रर्रर्र’ नाटक का सोडलं..? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता- लेखक- दिग्दर्शक प्रसाद खांडेकर म्हणाला की, ‘हास्यजत्राचं शूटिंग सुरू असतानाच नाटकही करायचं होतं. म्हणून आम्ही चौघांनी हे नाटक आणण्याचा निर्णय घेतला. ”कुर्रर्रर्र”ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. शूटिंग, चित्रपट आणि इतर गोष्टी यासाठी वेळेची जुळवाजुळव करताना मात्र नाटकाला वेळ कमी पडतोय की काय.. असं वाटू लागलेलं’.

‘महिन्याला १० ते १२ प्रयोग करायचे असताना नम्रता आणि माझ्या तारखांमुळे प्रयोग कमी होतायत असं आमच्या लक्षात येऊ लागलं होतं. बॅकस्टेज कलाकारांसाठी आणि इतर कलाकारांसाठीही याचे अधिक प्रयोग व्हायला हवेत असं वाटलं. त्यामुळे दोन- तीन महिन्यांपूर्वी सर्वांनी मिळून चर्चा केली आणि आम्ही या नाटकातून बाहेर पडून कलाकार बदलण्याचा निर्णय घेतला’.

प्रसाद- नम्रताच्या रिप्लेसमेंटमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली असली तरीही प्रियदर्शन आणि मयुरा हे तितकेच तगडे कलाकार असल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन थांबणार नाही याची खात्री निर्माती- अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी दिली आहे. येत्या ९ डिसेंबर २०२३ रोजी प्रियदर्शन- मयुरासोबत या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.