हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील व्यक्त होताना दिसतो. नुकताच प्रसादच्या आयुष्यातील अभिमानास्पद क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रसादचा मुलगा सार्थक याने नुकतीच पदवी स्वीकारली आणि हा क्षण एक पिता म्हणून अभिनेत्यासाठी फार भावनिक होता.
अभिनेता प्रसाद ओकला मयांक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. यापैकी सार्थक परदेशात शिक्षण घेत आहे. नुकताच त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला आणि यावेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रसाद ओक त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत आपल्या मुलाचे कौतुक करण्यासाठी हजर राहिला. याचा व्हिडीओ प्रसादने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सार्थकचा पदवी प्रदान सोहळा पहायला मिळतोय. जेव्हा सार्थक पदवी स्वीकारण्यासाठी जातो तेव्हा त्याची आई म्हणजेच मंजिरी ओक आनंदात ओरडते आणि ‘लाय लव्ह यू’ असं म्हणताना दिसते आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना प्रसाद ओकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सार्थकचा ”पदवी प्रदान समारंभ”… सार्थक… आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास… आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…’. याशिवाय प्रसादाची पत्नी म्हणजेच सार्थकची आई मंजिरी ओकने देखील काही फोटो शेअर केले आहेत आणि सोबत लिहीलंय, ‘कमाल क्षण, कमाल अनुभव, कमाल भावना…आयुष्याचं #सार्थक झालं..’. या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत सार्थकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.