‘अजून एक NATIONAL AWARD पक्क..’; रवी जाधवांच्या ‘मैं अटल हूँ’ सिनेमासाठी प्रसादची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रवी जाधव दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. काल शुक्रवारी, १९ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित असून रिलीजनंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमचे आणि खास करून रवी जाधव यांचे कौतुक केले आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाबाबत अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपले मत स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रसादने लिहिले आहे कि, ‘ ”मैं अटल हूँ” रवी जाधवनी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले पण माझ्यामते “मैं अटल हूँ“ हा रवीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे. ”पंकज त्रिपाठी“ ही आता व्यक्ती न राहता त्यांचे “विद्यापीठ“ झाले आहे’.

पुढे लिहिलंय, ‘माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण “पाहिले”. पण पुन्हा एकदा “मैं अटल हूँ“ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी “धडा“ घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम. रवी जाधव, मेघना जाधव आणि पंकज त्रिपाठींसह संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा..!!! रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!’ माहितीनुसार, ‘मैं अटल हूँ’ सिनेमाच्या प्रिमियरसाठी प्रसादने बायको मंजिरीसोबत हजेरी लावली होती आणि त्यानंतर हि पोस्ट शेअर केली आहे.