‘प्रत्येक बहिणीच्या पाठीशी…’; आनंद दिघेंचा उल्लेख करणारी प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट तुफान गाजला होता. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटात प्रसादने दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद कमालीचा होता. आता लवकरच या चित्रपटाचं सिक्वेल येणार आहे. अशातच भाऊबीजनिमित्त प्रसादने आनंद दिघेंवर आधारित एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होत आहे.

अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा तो याच माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. नुकतीच भाऊबीजनिमित्त प्रसादने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या लूकमधला स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन देत लिहिलं कि, ‘भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा. प्रत्येक बहिणीच्या पाठीशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा’.

प्रसाद ओकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट तुफान गाजला होता आणि आता प्रेक्षकांना ‘धर्मवीर २’ची प्रतीक्षा आहे. इतकंच नव्हे तर, आनंद दिघे यांच्या बायोपिकनंतर आणखी एका बायोपिकमध्ये प्रसाद ओकची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे नाव ‘परिनिर्वाण’ असे आहे. हा चित्रपट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित आहे.