प्रशांत दामले यांना मातृशोक; वयाच्या 92’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट आणि नाटक क्षेत्रात सक्रिय असलेले लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

नामवंत मनोरंजन वाहिनीने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे बुधवारी सकाळी १० वाजता निधन झाल्याचे समजत आहे. दरम्यान त्या ९२ वर्षाच्या होत्या. विजया दामले यांच्या पार्थिवावर आज अंधेरीतील अंबोली स्मशानभूमीत दुपारी ०४:३० च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचे निधन झाल्याने संपूर्ण दामले परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.

अभिनेते प्रशांत दामले हे त्यांच्या आईच्या अत्यंत निकट होते. त्यामुळे मातृछत्र हरपल्यानंतर प्रशांत दामले प्रचंड हतबल झाले आहेत. सुरुवातीला नाटक हा केवळ छंद आणि पैशांसाठी नोकरी असे प्रशांत दामले जगत होते. मात्र आई आणि पत्नीच्या पाठिंब्याने त्यांनी १९९२ साली पूर्णवेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला. आज आईच्या आशीर्वादाने ते रंगभूमीवरील प्रसिद्ध कलावंत म्हणून ओळखले जातात.