लगीनघटीका समीप आली!! मुग्धा- प्रथमेशच्या लग्नाआधीचे विधी सुरु; घाणा भरला.. हळद लागली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आमचं ठरलं म्हणत..’ प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांच्या लग्नविधींचा श्रीगणेशा झाला आहे. व्याहीभोजन, हळद समारंभ आणि घाणा भरण्याचा विधी पार पडला असून या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. मुग्धा आणि प्रथमेशच्या व्याहीभोजनाचा थाट पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमातील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मुग्धाने लाल रंगाची सुंदर काठापदराची साडी नेसली होती तर प्रथमेशने फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. नुकताच त्यांच्या हळदीचा कार्यक्रम देखील थाटात पार पडला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

मुग्धाच्या घरी घाणा भरण्याचा विधी देखील पार पडला आहे. तिने सोशल मीडियावर घाणा भरणे आणि हळद समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हळद लागलेली मुग्धा आणि तिच्या गालावरची लाली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये मुग्धा तिची बहीण मृदुल आणि आई- वडील दिसत आहेत.

तर दुसरीकडे प्रथमेशच्या हळदीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. हळदीने माखलेला प्रथमेश फारच गोड दिसतोय आणि सर्वांचे लक्ष वाढतोय. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करताना ‘मोदक हळदीने पिवळा झाला..’ असे म्हटले आहे. आता नेटकरी मुग्धा- प्रथमेशच्या लग्न मुहूर्ताची वाट पाहत आहेत.