हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लाडकं जोडपं मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अलीकडेच एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मुग्धा आणि प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केले. दोघांचा हा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला. यावेळी त्यांच्या लग्नाला मराठी कलासृष्टीतील अनेक गायक तसेच कलाकार मंडळी हजर होते. दरम्यान त्यांच्या लग्न सोहळ्यातील बरेच फोटो व्हायरल झाले असून या जोडप्याची लग्नानंतरची पहिली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मुग्धा आणि प्रथमेश दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लग्न सोहळ्यातील काही खास क्षण शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘आमचं झालंय!!’ मुग्धा- प्रथमेशचा विवाहसोहळा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने पार पडला. यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. सोबत हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने या लूकमध्ये नववधू फारच सुंदर दिसत होती.
तर लग्न लागतेवेळी प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि त्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक लूक केला होता. या जोडप्याच्या पारंपरिक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यापूर्वी त्यांच्या हळद आणि ग्रहमख सोहळ्यातील फोटोंची विशेष चर्चा रंगली होती. लग्नानंतर मुग्धा – प्रथमेशने शेअर केलेल्या पहिल्याच पोस्टवर नेटकरी, चाहते आणि कलाकार मित्र मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.