‘मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त बघण्यासाठी…’; पृथ्वीक प्रतापची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक विनोदवीर दिले. ज्यामध्ये अभिनेता पृथ्वीक प्रतापचा समावेश आहे. विविध स्किटमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून पृथ्वीकने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दरम्यान पृथ्वीक सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतो. आजही त्याने शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. जी प्रचंड चर्चेत आली आहे. ही पोस्ट त्याच्या स्वप्न पूर्तीबाबत आहे. अलीकडेच पृथ्वीक प्रतापने स्वतःचं असं हक्काचं घर घेतलं. ज्याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती दिली होती. अत्यंत कमी काळात आपलं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं त्याच स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आज पुन्हा एकदा त्याने नवीन पोस्ट शेअर करत अधिक माहिती दिली आहे. यात त्याने लिहिलंय, ‘स्वप्नांपासून… सत्यापर्यंत.. आजपासून ६ महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पनाही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल…’

पुढे लिहिलंय, ‘ आज आईला आणि जाईला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय. तरीही अजून Penthouse आणि Queen’s Throne बाकी आहे. पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही तर पूर्ण करण्यासाठी असतात’. या पोस्टसोबत पृथ्वीकने आई आणि जाईचे त्यांच्या नवीन घरातील फोटो शेअर केले आहेत. त्याने लिहिलेलं कॅप्शन त्याची स्वप्नपूर्तीची भूक दाखवत. त्यामुळे येत्या काळात लवकरच तो बाकी स्वप्नांचा प्रवास देखील पूर्ण करेल अशी आशा आहे. पृथ्वीकच्या या पोस्टवर मराठी अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी आणि त्याचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.