‘तू माझ्या आयुष्यात असणं…’; उमेशच्या वाढदिवशी ‘त्या’ 7 फोटोंसोबत प्रियाने लिहिली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गोड जोडी म्हणेज अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या जोडीने मालिका, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर हे जोडपं कायम चर्चेत असतं. अशातच आज अभिनेता उमेश कामत त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त मराठी सिनेविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा होत असताना त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

उमेशची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये प्रियाने उमेशचं खूप कौतुक करत त्याचे काही Unseen फोटो शेअर केले आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. या प्रत्येक फोटोंखाली तिने खास कॅप्शन लिहिलं आहे. प्रियाने लिहिलंय, ‘माझा गोड उमेश!!! तू माझ्या आयुष्यात असणं हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. मला कसं चिडवायचं अन् कसं प्रेम करायचं सगळंच तुला माहीत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम!’

या पोस्टमध्ये प्रियाने एकूण ७ फोटो शेअर केले आहेत आणि प्रत्येकाला एक स्पेशल कॅप्शन दिलं आहे. पहिल्या फोटोसाठी, ‘आयुष्यभर असेच एकत्र राहू…’. दुसऱ्या फोटोसाठी, ‘तुला खेळकरपणे चिडवण्याचा अन् त्रास देण्याचा आनंद मी आयुष्यभर घेत राहीन’. तिसऱ्या फोटोसाठी, ‘आमच्या दोघांमधला वेडेपणा असाच राहो!’. चौथ्या फोटोसाठी, ‘आयुष्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी तू मला अशीच साथ दे…’. पाचव्या फोटोसाठी, ‘आपल्या आई- बाबांचे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत’. सहाव्या फोटोसाठी, ‘शारिवाचा तू कायम आवडता राहशील’. (शारिवा ही प्रियाच्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे.) सातव्या फोटोसाठी, ‘तुझे आई- बाबा तुझ्यावर सदैव लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज तुला आयुष्यात भरभरून यश आणि प्रेम मिळालं आहे’. प्रियाने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.