‘तुझेच मी गीत गात आहे’मधून प्रिया मराठेची एक्झिट; ‘या’ कारणामुळे सोडली मालिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपापल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या मालिकेतून अभिनेत्री प्रिया मराठे हि ‘मोनिका’ या नकारात्मक भूमिकेत आपल्या भेटीस येत होती. होती म्हणायचे कारण असे कि, प्रियाने नुकतीच या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. होय. इतकेच नव्हे तर मालिका सोडण्यामागील कारण देखील तिने व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

प्रिया मराठेचा हा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्रिया मराठे म्हणाली आहे कि, ‘नमस्कार, तुम्ही मला ‘’तुझेच मी गीत गात आहे’’ या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात. पण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही. आता मी तुमचा निरोप घेते आहे. अचानक तब्येतीची आलेली अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. ही भूमिका करताना मला खूप मजा येत होती. तुम्हालाही मोनिका खूप आवडत होती.

पण जो वेळ मी त्यांना देत होते तो वेळ कुठेतरी अपुरा पडत होता. बाकीच्या कलाकारांच्या वेळा, क्रिएटिव्ह टीम, प्रोडक्शन टीम, ती भूमिका इतकी डिमांडिंग होती. या सगळ्याच कारणांमुळे मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो. पण तुम्ही मालिका पाहणं सोडू नका. कारण माझी भूमिका आता दुसरी अभिनेत्री करणार आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या मालिकेतून एका नव्या भूमिकेतून’.

हा व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना अतिशय भावुक कॅप्शन लिहिले आहे. यात लिहिलंय, ‘मोनिका म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप.आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप मिस करू. पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत. प्रिया तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा’. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून प्रिया मराठेचे चाहते ‘तू मालिका सोडू नकोस’, ‘आम्ही ही मालिका पाहणार नाही’, ‘तुला खूप मिस करु’ अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.