उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात दिसली होती. यामुळे तिचा चाहता वर्ग हळूहळू वाढतोय. दरम्यान ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते आणि नुकतेच तिने काही जुने फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने तिच्या इयत्ता दहावीतील काही फोटो तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. मुख्य म्हणजे या फोटोत ती मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याबरोबर दिसत आहे. तर इतर दोन फोटोत तिने अभिनेत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहले आहे जे कमाल चर्चेत आहे.

या फोटोला कॅप्शन देत प्रियदर्शनी म्हणाली, ‘१० वी मधे ‘‘नवा गडी नवं राज्य’’च्या प्रयोगानंतर बॅकस्टेजला जाऊन फोटो काढलेले. त्या नंतर जवळपास १३ वर्षांनी फोटो काढले, ‘फुलराणी’ च्या प्रीमियरनंतर! त्या प्रीमियरच्या रात्री, त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान दिसत होता आणि तो क्षण माझ्यासाठी फारच खास होता. खूप प्रेम. ते दोघेही मी पुन्हा सांगते ते दोघेही आजही तसेच काहीसे दिसतात, पण कसे आणि माझ्याबद्दल मी न बोललेलच बरं!’. या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापटने प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, ‘प्रियदर्शनी काय कमाल आठवण आहे ही!! तू खरंच उत्तम अभिनेत्री आहेस आणि तू या प्रेमासाठी नक्कीच पात्र आहेस’.