हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसतो. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तो सिनेविश्वात कार्यरत आहे. केवळ मनोरंजनसृष्टीत नव्हे तर सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत पुष्कर कायम सजग दिसतो. विविध विषयांवर आपली मतं तो अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे मांडताना दिसतो. दरम्यान, अलीकडेच केतकी चितळेने पालिकेचे कर्मचारी घरी येऊन जातीय सर्वेक्षण करत असल्याचे लक्षात आणून देत संताप व्यक्त केला होता. यानंतर आता पुष्कर जोगसोबत देखील असाच काहीसा प्रकार घडला. ज्याबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये हि पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय कि, ‘काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार’. पुष्कर जोगची हि पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून व्हायरल होताना दिसते आहे.
दरम्यान, अभिनेता पुष्कर जोग सध्या त्याच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ठिकठिकाणी स्पॉट होत आहे. ‘मुसाफिरा’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः पुष्कर जोगने केले आहे. शिवाय या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत देखील पुष्कर आपल्याला दिसणार आहे.