मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘अशी’ केली भाजी विकणाऱ्या आजोबांची मदत; म्हणाली, ‘पोटासाठी काम करणारे..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. नाटक, मालिका, चित्रपटातून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टमूळे कायम चर्चेत येताना दिसते. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री राधिका देशपांडेने हि पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हा व्हिडीओ बाजारातील एका भाजी विक्रेत्याचा आहे.

हा व्हिडीओ शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘दिवस मोठा होता. काल प्रभू श्रीराम आले. सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता. एका कोपऱ्यात हे आजोबा बेंबीच्या देठापासून ४० रुपयांना एक जुडी विकायचा प्रयत्न करीत होते. त्यांचा आवाज काही सेकंद माझ्या कानांत घुमत राहिला. एकीकडे नाटकाच्या प्रयोगाची पहिली घंटा वाजली होती; पण हे काम मला करायचं होतं. आजच. कोणतं..? व्हिडीओ बघा. माझी आई म्हणते की, काही ठिकाणी भाव करायचा नाही; तर काही ठिकाणी भाव केल्याशिवाय काहीही विकत घ्यायचं नाही. संपूर्ण दुकान विकत घेतलं न भाव करता. पोटासाठी काम करणारे आजोबा आज पोटभर नक्की जेवतील याची सोय केली. दिवस रामाचा. काम रामाचं. एखाद्या नाटक सिनेमातला प्रसंग आठवला की, महाराज, अभिनंदन! राणी सरकारला मुलगा झाला. मग राजा कसलाही विचार न करता, त्याच्या गळ्यातली रत्नजडित माळ सुईणीला देतो. तसंच काहीसं’.

‘आनंद तर मलाही झाला होता प्रचंड. मीही राणी सरकार असल्यासारखा आनंद लुटला. दिसेल त्याला कोथिंबीर वाटत सुटले. नाटकातल्या कलाकारांनी माझ्या या कामाचं स्वागतच केलं आणि आनंदानं कोथिंबीर घरी नेली. आईने जे सांगितलं ते माझ्या मुलीला मी सांगितलंच आहे; पण त्यात एक जुडी आणखीन जोडेन. “अंतरा, आयुष्यात काही दिवस असे येतील की, त्या दिवशी भाव करायचा नाही आणि चांगले काम केले हे सांगताना भाव खायचा नाही.” त्या आजोबांच्या घरी दिवाळी आली की नाही माहीत नाही; पण मी मात्र दिवाळी, अशी साजरी केली. कारण- दिवस मोठा होता. आणि मन मोठं का छोटं, ते कसं मोजता येईल? मनात राम होता आणि तो मनात घर करून राहिला’. राधिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यावर अभिनेता समीर चौघुले यांनी केलेली कमेंट चर्चेत आली आहे. त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलंय, ‘त्या आजोबांचं निर्मळ हास्य ही तुझी कमाई’.