केदार शिंदेंच्या आयुष्यात राज ठाकरेंची ‘मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या’ची भूमिका; ‘तो’ व्हिडीओ पहाच


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक अशी मराठी सिनेविश्वात ख्याती असलेले केदार शिंदे सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. यानिमित्त नुकतीच त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये केदार शिंदेंनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. इतकेच काय तर राजकारणात प्रवेश करण्याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. पाहुयात ते काय म्हणालेत.

या मुलाखतीमध्ये बोलताना केदार शिंदे म्हणाले कि, ‘माझी राजकारणात यायची खूप इच्छा आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावर मी बोलणार नाही, पण आपण कायम कुंपणावर बसूनच बोलत असतो. आता ते ओलांडून रिंगणात यायची वेळ आहे. तरच मला त्यावर बोलायचा अधिकार आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करून मी माझ्या घरात स्थैर्य आणेन अन् मगच मी राजकारणाकडे वळेन. सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक काम करण्यासाठी मला राजकारणात जायचं आहे. राज ठाकरेंनी मला पडत्या काळात पाठिंबा दिला, त्यामुळे आता त्या माणसाबरोबर मला उभं राहायचं आहे’.

इतकंच काय तर आपल्या या जीवनपटाचं सर्वाधिक श्रेय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. केदार शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री फार जुनी आहे. त्यामुळे अनेकदा केदार शिंदे आणि राज ठाकरे विविध सोहळे, लॉन्च इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. या मुलाखतीनंतर केदार शिंदे कधी राजकारणात उतरतात..? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ६५ कोटींचा गल्ला केला आहे.