‘हा महिलांनी नव्हे तर पुरुषांनी पहायचा सिनेमा..’; ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला आहे. दमदार कामगिरीसह ७० कोटींचा आकडा पार करणारी कमाई करत या चित्रपटाने एक वेगळाच विक्रम केला आहे. या चित्रपटाला तमाम महिला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मात्यांनी आता हा चित्रपट पुरुषांनी देखील पहावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी हा चित्रपट केवळ १०० रुपयांत पाहण्याची खास ऑफर आजपासून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर विशेष प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडीओ केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये राज ठाकरे म्हणतायत कि, ‘जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा घरी येऊन बायकोला याच्या कथेबाबत सांगितले. माझ्या पत्नीशी चर्चा करताना मी म्हणालो, ‘‘हा बायकांप्रमाणे प्रत्येक पुरुषाने पाहावा असा चित्रपट आहे”. आपल्या माता- भगिनी कशामधून जात असतात हे प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याची गरज आहे. महिलावर्ग चित्रपटगृहांमध्ये जाऊन त्या कथेशी स्वत:ला रिलेट करत आहेत… हे सर्वकाही आलेच परंतु, पुरुषवर्गाने त्यांच्यासह हा चित्रपट पाहणे जास्त गरजेचे आहे. चित्रपट पाहून आयुष्यात सुरु असलेल्या चुकीच्या गोष्टी बाजूला काढण्यासाठी पुरुषांनी हा चित्रपट जरूर पाहावा. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्वात मोठे यश त्याच्या कथानकात आणि दिग्दर्शनात आहे’.

राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘माननीय राजसाहेब ठाकरे यांची “मनसे” प्रतिक्रिया.. #बाईपणभारीदेवा सिनेमा पाहिल्यावर त्यांचं म्हणणं तेच आहे, जे मी सिनेमा सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे. तीचं मन समजून घेण्यासाठी तिच्या सोबत थिएटर मध्ये जाऊन पहा.. #बाईपणभारीदेवा फक्त १००/- रूपयात आता आनंद लुटा’.