‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने उरकलं लग्न; हर्षदा खानविलकरांनी शेअर केला फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी गेल्या महिन्याभरात लग्नबंधनात अडकली आहेत. यामध्ये प्रसाद जवादे – अमृता देशमुख, पियुष रानडे – सुरुची अडारकर, मुग्धा वैशंपायन – प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर – आशिष कुलकर्णी या कलाकार मंडळींचा समावेश आहे. तर नुकत्याच लग्न बंधनात अडकलेल्या या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील अभिनेत्री मानसी घाटेचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मानसी घाटेने तिच्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानसी आणि आकाश पंडित एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते.

अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराच्या साक्षीने एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. या लग्न सोहळ्याला अभिनेत्री हर्षदा खानविलकर उपस्थित होत्या. त्यांनी सोशल मीडियावर या नवदांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले आहेत.

मानसी आणि आकाश यांनी मराठमोळ्या पद्धतीने विवाह केला. यासाठी त्यांनी केलेला मराठमोळा लूक शोष मीडियावर फार लक्षवेधी ठरला. मानसीने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, तर आकाशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी पितांबर आणि त्यावर पुणेरी पगडी परिधान केली होती. माहितीनुसार, मानसीचा नवरा आकाश पंडित हा लाइटिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहे. अभिनेत्री मानसी घाटेने स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची जवळची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारली होती.