‘रंग माझा वेगळा’मधील छोट्या कार्तिकीने बनवल्या चटकदार चकल्या; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात दिवाळीच्या मंगलमयी सणाला सुरुवात झाली आहे. आनंद, उत्साह, चैतन्य आणि उमेद घेऊन येणारी दिवाळी सगळ्यांचा आवडता सण आहे. दिवाळी म्हटलं कि, नवनवीन कपड्यांची खरेदी, दागिने, दिवे, कंदील, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आलाच. लोक एकमेकांना आपापल्या घरी फराळ खाण्यासाठी आमंत्रित करतात. स्वतःच्या हाताने फराळ बनवण्याची मजा काही औरच असते आणि ही मजा ‘रंग माझा वेगळा’ मधील चिमुकली कार्तिकी घेताना दिसली.

दिवाळीतील सर्वात अवघड आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फराळ. फराळाचे ताट नसेल तर दिवाळी अपूर्ण वाटते. त्यामुळे दिवाळीत घराघरात फराळ असतोच. या फराळामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे चकली. अगदी कुरकुरीत, चटकदार आणि थोडीशी तिखट चकली प्रत्येकाला खायला आवडते. पण चकली बनवायची म्हटलं कि भल्याभल्यांना घाम फुटतो. असे असताना बालकलाकार मैत्रेयी दातेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चकल्या बनवताना दिसतेय.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिकेतील कलाकार मंडळी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तर याच कार्यक्रमातील छोट्या कार्तिकीची भूमिका बालकलाकार मैत्रेयी दातेने साकारली होती. सध्या मैत्रेयीचा चकल्या बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या इंस्टाग्रामवर हॅण्डलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शमध्ये लिहिलं आहे कि, ‘झाला का फराळ बनवून..? माझी सर्वात आवडती चकली’. या व्हिडीओमध्ये मैत्रेयी मस्त अशा गोल गोल अशा चकल्या गाळताना दिसत आहे. तिचा या व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.