हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची आणि प्रेमात आकंठ बुडून तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या ‘त्या’ची गोष्ट आता लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम करताना दिसत आहेत. एक वेगळ्या कथानकाची वेगळी गोष्ट घेऊन सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
सोनी मराठीवर येत्या २१ ऑगस्ट २०२३ पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेचे कथानक एका सर्वसाधारण घरातील मुलीवर आधारलेले आहे. आपला होणारा नवरा श्रीमंत असावा, जो आपली सगळी स्वप्न पूर्ण करेल अन् आपल्याला राणी सारखं ठेवेल, असं वाटणारी मीरा आणि मीराच्या प्रेमात पडलेला मल्हार अशा दोघांची गोष्ट म्हणजे ‘राणी मी होणार’.
मीरा आणि मल्हार दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून वसईतील एका सलॉनमध्ये एकत्र काम करत असतात. यात मीरा नेल आर्टिस्ट तर मल्हार हेअर स्टायलिस्ट असल्याचे दाखवले आहे. अलीकडेच मालिकेच्या प्रमोशन दरम्यान या मालिकेतील कलाकारांनी एक ॲक्टिंव्हिटी मीडियासोबतही केली.
ज्यामध्ये त्यांनी त्यांनी खऱ्याखुऱ्या पार्लरमध्ये जाऊन एक्सपर्ट्सच्या मदतीने पत्रकार मंडळींचे आणि रिअल कस्टमर्सचे ग्रुमिंग केले. नेलआर्ट, आय मेकअप, हेअर स्टाईल अशा सलोन सर्व्हिस त्यांनी अगदी प्रोफेशनल्स सारख्या दिल्या. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत ब्युटी आणि मेकअप सिक्रेटस् शेअर केले. यानिमित्ताने कलाकारांनीही खऱ्या पार्लरमध्ये सर्व्हिस देण्याचा अनुभव घेतला.